
मागील काही दिवसापासून उमरखेड शहरात दररोज सकाळ पासून ते दुपारपर्यंत नाहक विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने शहरवासी हैरान झाले आहे . विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पवन मेंढे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
उमरखेड शहरांमध्ये दररोज सकाळपासून दुपारपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त
झाले आहेत . दुसरीकडे वीज ग्राहकांना त्वरित वीज बिलाचा पूर्ण भरणा करा अन्यथा विज पुरवठा खंडीत करू, अशी दमदाटी विद्युत कंपनीचे कर्मचारी करतात मात्र अलीकडच्या काळात कुठलेही कारण नसताना दररोज तासंतास विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शहरवासीयांच्या होत असलेल्या परेशानीबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पवन मेंढे यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे विजेच्या लपंडावाच्या दररोज चाललेल्या खेळाबाबत चांगलेच धारेवर धरले व हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, चाललेला खेळ बंद करून विद्युत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.