
हिमायतनगर तालुक्यातील वीरसणी शिवारात पैनगंगा नदीच्या तीरावर अवैध उपसा केलेला रेतीसाठा जप्त करून घरकुलासाठी वाटप करा, असे निवेदन देणारे आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गजानन जिद्देवाड यांना वाळू माफियांनी मारहाण करत त्यांच्या गळयातील सोनसाखळी आणि ५ हजार रुपये लुटले. त्यांचे दोन मोबाईल फोडून १ लाखाचे नुकसान केले. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैनगंगा नदी तीरावरील अनेक गावच्या नागरिकांनी सामाजिक माध्यमातून अवैध वाळू उपस्याचे व पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघडकीस आणले. आष्टी येथील रहिवासी गजानन जिद्देवाड यांनी पैनगंगा काठावर असलेले रेती साठयांचे अनेक फोटो घेऊन ही रेती जप्त करावी आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिमायतनगर तहसील कार्यालयाला दिले होते. हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी याप्रकरणी कारवाई करत हे रेतीसाठे जप्त करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. त्यावरून वीरसणी शिवारातील सुमारे ५ हजार ब्रास रेती जप्त करण्यात आली. परंतु इथेही महसूल कर्मचाऱ्यांनी चलाखी करत आणि अवैधसाठेधारकांकडून चिरीमिरी
घेऊन जप्त केलेली रेती कमी दाखवली. २ दिवसात जप्त रेतीपैकी ३ हजार ब्रास रेती माफियांनी लांबवली. शुक्रवारी वीरसणी शिवारातील जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात येणार होता. त्यासाठी तहसीलदार पल्लवी टेमकर जप्ती ठिकाणावर येणार होत्या. तहसीलदार येण्याच्या थोड्या वेळ अगोदरच तक्रारदार गजानन जिद्देवाड तिथे पोहोचले व त्यांनी कमी झालेले रेतीसाठे चित्रित करण्यास सुरुवात केली. यावेळी रेतीमाफीयांनी तलाठयास व्हिडिओ शूटिंग करत असल्याची माहिती दिली. तलाठ्याने रेतीमाफीयांना चिथावणी देऊन मारहाण करीत मोबाईल फोडून टाकण्यास प्रवृत्त केले. रेतीसाठयाचे चित्रीकरण करतांना रेतीमाफियांनी जिद्देवाड यांना अडवले.
व्हिडिओ रेकॉर्डिंग का केलीस असे विचारून अफरोज याने गालावर थापड मारली तर सोनू देवसरकर यांनी लाकडाने मारहाण केली. याच दरम्यान तिथे ८.१० विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून आलेल्या रेतीमाफियांनी जिद्देवाड यांना लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. एकाने तर ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखत जिद्देवाड यांनी घटनास्थळापासून पलायन केले. मारहाण करताना रेतीमाफियांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. एखाद्याला खतम केले तरच पुढील वर्षी आपणाला रेती उपसा करण्यासाठी कोणी अडवणार नाही असे ते म्हणत होते. जिद्देवाड यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यावर शे. अफरोज, सोनू देवसरकर व इतर अनोळखी ८.१० जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.