
उमरखेड आणि महागाव तालुक्यातील ऊर्जा विभागांतर्गत प्रलंबित विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी दुपारी ३ वाजता एमएसईबी होल्डिंग कंपनी कार्यालय, फोर्ट, मुंबई येथे करण्यात आले आहे.
आमदार किसन वानखेडे यांच्या मागणीवरून या बैठकीचे आयोजन अप्पर ऊर्जा विभागाच्या वतीने होणार असून, या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, संचालक, संचलन प्रकल्प आस्थापना महावितरण व महापारेषण, विद्युत निरीक्षक, अमरावती मुख्य अभियंता, यवतमाळ अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, पुसद व इतर संबंधित अधिकारी हजर राहणार आहेत.उमरखेड आणि महागाव तालुक्यातील गंभीर वीज समस्यांबाबत बैठक आयोजित करण्याबाबत आमदार किसनराव वानखेडे पाठपुरावा करणार आहेत. उमरखेड व महागाव विधानसभा मतदारसंघातील उमरखेड व महागाव तालुक्यांमध्ये वीज समस्येचे प्रमाण अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहे. वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाची वीज, वीज पुरवठ्यातील अनियमितता यामुळे शेतकरी वर्ग, व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा कृती झाली नसल्यामुळे एक विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीमुळे निश्चितच उमरखेड व महागाव तालुक्यांतील विजेचा प्रश्न सुटणार आहे.