
उमरखेड, महागाव विधानसभा मतदारसंघातील स्मशानभूमी विना असलेल्या एकूण सत्तावीस गावाना अंत्यसंस्कारासाठी त्यांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांचे दालनात दि.2 जून रोजी आमदार किसनराव वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व भाजपा यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा,माजी आमदार विजयराव खडसे यांचे प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
यावेळी उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उमरखेड तहसीलदार राजू सुरडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पंजाब रणमले,अमोल चव्हाण, महागाव गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, नायब तहसीलदार राठोड दोन्ही तालुक्याचे भूमिअभिलेख उपअधीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी स्मशानभूमी नसलेल्या गावचे तलाठी,ग्रामसेवक व सरपंच यांचेकडून जागे संदर्भात आढावा घेण्यात आला.त्याठिकाणी ई वर्ग, ह वर्ग जमीन असेल तर ती जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा व त्यास आपण जिल्हाधिकारी महोदयांकडून मंजुरात मिळवून घेऊ असे आश्वासन यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी उपस्थित ग्राम अधिकारी व सरपंच यांना दिले.तर जेथे शासनाची कोणत्याही वर्गाची जमीन उपलब्ध नाही अशा ठिकाणी गावा लगत असलेल्या काही स्थानिक नागरिकांच्या जमिनी असतील तर त्यांनी दान स्वरूपात स्मशानभूमीसाठी देण्या संदर्भात ग्रामसेवकानी सकारात्मक चर्चा करण्याच्या सूचना जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उपस्थित ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांना दिल्या.
ज्या ज्या गावी दहन शेड नाही त्या त्या गावी येत्या जिल्हा नियोजन समिती मध्ये दहन शेड मंजूर करून घेणार असल्याचे देखील यावेळी आमदार वानखेडे यांनी उपस्थितांना सांगितले.
याप्रसंगी उमरखेड तालुक्यातील चालग्नी,कोपरा बु. व खु., चिखली (वन), कोपरा बु., कृष्णापुर, कुपटी, माणकेश्वर, मरसुळ, नागेश्वर, सोयीट (घ.), टाकळी (रा.),टेम्भुरदरा व तिवडी तर महागाव तालुक्यातील हिवरदरी, दहिवडी (खु.),बेलदरी, नाईक नगर,तरोडी,नगरवाडी, बोढारा, तुळशीनगर, हिवळणी, चीचपाड, नांदगव्हान,चिल्ली, सेवानगर या गावांचे तलाठी,ग्रामसेवक व सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.