परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका जातीवादी विकृत इसमाने दगडाने ठेचून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे संविधान प्रेमी व आंबेडकरवादी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या जातीयवादी इसमाला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी ढाणकी शहरातून मोर्चा काढण्यात आला होता. बौद्ध विहारापासून निघालेला हा मोर्चा संविधान चौक येथे समाप्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना पोलीस स्टेशन बिटरगाव ची ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्फत निवेदनही सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये शहरातील संविधान प्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवून त्या घटनेचा जाहीर निषेध केला. निवेदन देतेवेळी माजी जि प सदस्य रामराव गायकवाड, आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टि विनकरे, नगरपंचायत सभापती संबोधी गायकवाड, नगरसेवक प्रतिनिधी सुभाष गायकवाड, भारत मुक्ती मोर्चा तालुकाप्रमुख प्रकाश कांबळे, भिम टायगर सेना जिल्हा उपप्रमुख करण भरणे, वसंतराव उर्फ बाळू पाटील चंद्रे, खाजाभाई कुरेशी, स्वप्निल चिकाटे, ऐजास पटेल, रुपेश भंडारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.