निंगनूर प्रतिनिधी: संतोष वायकुळे
बंजारा समाजाची काशी, तीर्थक्षेत्र पोहरादेवी हे बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहे. याच पवित्र स्थळी उभारण्यात येणाऱ्या बंजारा समाजाचे नंगारा भवनाचे उद्घाटन एका ऐतिहासिक सोहळ्यात करण्यात येणार आहे, ज्याचे प्रमुख पाहुणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन दिनांक ५ आँक्टोबंर रोजी करण्यात आले आहे.
बंजारा समाजाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची जाणीव व्हावी यासाठी पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या अथक प्रयत्नांनी ‘विरासत ए बंजारा’ संग्रहालय उभारले जात आहे. हे संग्रहालय बंजारा समाजाचा इतिहास जतन करण्याचे एक महान कार्य ठरणार आहे. सध्या संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, यामध्ये एकूण १३ गॅलरी तयार करण्यात आल्या आहेत. या गॅलरींमध्ये बंजारा समाजाच्या विविध ऐतिहासिक घटनांचे चित्रण व देखावे साकारण्यात आले आहेत, ज्यामुळे समाजाच्या इतिहासाची संपूर्ण कहाणी या संग्रहालयाच्या माध्यमातून उलगडली जाईल.
हा लोकार्पण सोहळा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा.उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत होणार आहे. याशिवाय अनेक साधू-संत, समाजातील प्रमुख व्यक्ती व इतर मान्यवर साक्षीदार असतील.
शिवसेना उप तालुकाप्रमुख अंकुश भाऊ राठोड यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, “हा सोहळा केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग ठरेल.”