
मौजे बिटरगाव ते चिंचोली (संगम) ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील पं. ग्रा.योजने अंतर्गत राज्य मार्ग २८२ बिटरगाव ते चिंचोली (संगम) एकूण लांबी ८.६७ किलोमीटर रुंदी ३.७५ मीटर असून सदर रस्त्याचे काम हे टी अँड टी इन्फ्रा लि. पुणे ही कंपनी करीत असून, सदर रस्त्याचे २०२४ रोजी वर्कआउट ऑर्डर निघालेले आहे. सदर रस्त्याचे काम हे अतिशय संथ गतीने तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे व त्यावर संबंधित विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचे नियंत्रण राहिलेले नाही. सदर निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात वेळोवेळी ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे अधिकारी ज्युनिअर अभियंता, उप विभागीय अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याकारणाने अधिकारी हे कंपनीशी हितसंबंध जोपासत असल्याची दाट शंका ग्रामस्थांना येत आहे. • GSB (ग्रॅन्युअल सब बेस) मध्ये चढ – उतार असून रुंदी एकसमान नाही, • DLC (ड्राय लीन सिमेंट काँक्रीट) च्या अगोदर मूळ डांबरी रस्त्याचा पृष्ठभाग उकरण्यात आला नसल्यामुळे DLC चा थर बेसग्रेड असलेल्या डांबरी रस्त्याशी एकरूप (bonding) झाला नसल्याने अल्पावधीत रस्ता खचणे व भेगा पडण्याची दाट शक्यता आहे, • DLC चा २.४ की मी लांबीच्या टाकण्यात आलेल्या थराला क्युरिंगसाठी पाणी मिळाले नसल्याकारणाने तो पूर्णतः उघडून निकामी झालेला आहे • रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टी साठी मुरुमा ऐवजी दुतर्फा खोदकाम करण्यात आलेल्या नाल्यातील काळ्या मातीचा वापर करण्यात येत आहे, • एक किलोमीटर काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याच्या ५० टक्के भागात गज (बार) वापरलेला नाही. • चालू असलेल्या रस्त्याच्या उर्वरित बाजूच्या रस्त्याची डागडुजी करून तो वाहतुकीसाठी सुरू करून देणे अपेक्षित असताना सुद्धा देण्यात आलेला नाही.
तरी सदर निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात समिती गठीत करून चौकशी अहवालात आढळून आलेल्या दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाही करून इतरत्र बदली करण्यात यावी तसेच संबंधित कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी. अशा आशयाचे बिटरगाव, चिंचोली व मार्लेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.